प्रतिनिधी मुंबई विविध कारणांनी सतत होणारे बंद, आंदोलने यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून यापुढे कुठल्याही बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय राज्यातील उद्योजकांची शिखर संघटना असलेल्या ममहाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरफो घेतला आहे. बंद आणि आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानामुळे व्यापारी हैराण झाले असून व्यापारी संघटनेने हा ठराव केला आहे. त्यानुसार आगामी काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला व्यापारी पाठिंबा देणार नसल्याची भूमिका ममहाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सफचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी मांडली. देशभरात बंद आणि आंदोलने वाढली असून त्याचा फटका सामान्य व्यापाऱ्यांना बसत आहे. आंदोलनादरम्यान होणाऱ्या हिंसेमुळे व्यावसायिकांचे नुकसान होते. दुकाने सुरु ठेवली तरी ग्राहक येत नाहीत. त्यामुळे भविष्यात कोणत्याही बंदमध्ये व्यापारी सामिल होणार नाहीत, असे मांडलेचा यांनी सांगितले. बंद किंवा आंदोलनात व्यावसायिक दुकाने बंद न करता काळ्या पट्ट्या बांधून पाठींबा देऊ. दुकाने सुरु असताना अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस व प्रशासनाने व्यावसायिकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यात अनुचित प्रकार घडल्यास शासनाने जबाबदारी घ्यावी, असा ठराव ममहाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर च्या परिषदेत मांडण्यात आला आहे. राज्यभरातील व्यावसायिकांकडून असा ठराव केला जाणार आहे.